मुंबई-ठाण्यात मराठी माणूस कोणासोबत? 'उत्तर भारतीय सन्मान' की 'मराठी आत्मसन्मान'? सविस्तर

मुंबई : आगामी निवडणुकीत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उफाळून येऊ शकतो. त्यात मुंबई आणि ठाण्यातील मागील काही वर्षात अनेक लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघात अमराठी मतदारांचे प्रमाण इतके वाढले की शिवसेनेसारख्या पक्ष सुद्धा मतांच्या लाचारीत मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर’सारख्या शहरांमध्ये ‘उत्तर भारतीय सन्मान’ मेळावे आयोजित करून मराठी अस्मिता खुलेआम वेशीवर टांगताना दिसत आहेत. किंबहुना मुंबई ठाण्यासारख्या शहरातील मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठीच राखीव असल्याचे सध्याचे चित्र आहे.
या शहरातील दुसरं भीषण वास्तव हेच आहे की, राजकीय दृष्ट्या मराठी माणसा इतका सुस्त आणि विखुरलेला मतदार शोधून सुद्धा सापडणार नाही. इथल्या मराठी माणसानेच मुळात स्वतःला गृहीत धरले आहे आणि परिणामी राजकीय पक्षांनी सुद्धा नेमकं तेच हेरलं आणि इतर अमराठी समाजाला स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी जवळ केलं. निवडणुका जवळ येताच मागील ४ वर्ष उत्तर भारतीय सन्मानात तल्लीन झालेल्या शिवसेनेला, त्यांच्या गृहीत धरलेल्या ‘राखीव’ मराठी मतदाराची आठवण येणार नाही असे होणार नाही. मुंबईसारख्या शहरात मराठी माणसाची जेव्हा उत्तर भारतीय घोळक्याने डोकी फोडली तेव्हा, केवळ डोकी फुटलेला मराठी माणूस हा प्रतिस्पर्धी पक्षाचा असल्याने, त्याच मराठी माणसाची समाज माध्यमांवर टिंगल टवाळी करण्यात शौर्य दाखवलं. पुन्हा मनसेकडून त्याच उत्तर भारतीय समाजाला घेरण्यात आले तेव्हा, शिवसेनेचे मुंबई शहरातील आमदार ‘उत्तर भारतियों के सन्मान में शिवसेना मैदान में’ अशी नारेबाजी करत रस्त्यावर उतरले. इथेच त्यांचे बेगडी मराठी प्रेम सिद्ध होतं.
मुंबई-ठाणे शहरांमधील अमराठी टक्का वाढत असताना, शिवसेना केवळ मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाला पोरकं करून उत्तर भारतीयांच्या आहारी गेली आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला मनसे पक्ष केवळ मराठी माणसाच्या भरोशे झाल्याने त्यांचं मोठं राजकीय नुकसान झालं. मात्र, असं असताना देखील राज ठाकरे यांनी आजही मराठीचा हट्ट सोडलेला नाही, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्याउलट मुंबईतील ‘उत्तर भारतीय पंचायत’मध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी मराठीचाच हट्ट धरल्याचे दिसले. भाजप-शिवसेनेला सत्तेत बसवून सुद्धा मराठी माणसाला कोणत्याही मदतीसाठी ‘मातोश्री’ ऐवजी कृष्णकुंज’वर धाव घ्यावी लागते, यावरूनच सत्ताधाऱ्यांवरील मराठी माणसाचा विश्वास सिद्ध होतो. परंतु, तो मतदानात परिवर्तित होताना दिसत नाही हे नित्याचेच. त्यामुळे मराठी माणूस हा राजकीय दृष्ट्याच संभ्रमात असल्याचं लक्षण म्हणावं लागेल.
मुंबई ठाण्यात मतदार म्हणून सर्वच पक्षांमध्ये विखुरलेला मराठी मतदार हा कधीच एखाद्या विशिष्ट पक्षाकडे एकगठ्ठा राहिला नाही आणि त्यामुळे तो मनसे वगळता इतर पक्षांसाठी राजकीय दृष्ट्या अस्पृश्य झाला. दुसऱ्या बाजूला मुंबई आणि ठाण्यातील अमराठी मतदार बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार का होईना, पण एका विशिष्ट पक्षाच्या पदरात एकगठ्ठा मतदान करून त्यांना स्वतःच्या मागे-पुढे फिरण्यास भाग पाडू लागले. परंतु, मराठी माणूस परिस्थितीच्या नावाने रडण्यात वेळ घालवताना दिसला, पण एकजूट कधी झालाच नाही आणि यामुळेच त्याचा भविष्यात सुद्धा राजकीय घात होईल यात शंका नाही. त्याउलट शिवसेनेने परिस्थिती आणि मराठी माणसाची मानसिकता ओळखून ‘हिंदुत्व’ नावाचं पिल्लू मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरात सोडलं आणि उत्तर भारतीयांच्या सन्मानात स्वतःला वाहून घेताना दिसली. झोपडपट्टी पुनर्वसन’सारख्या योजना या उत्तर भारतीय लोंढ्यांच्या हक्काच्या होऊन बसल्या आणि मराठी माणूस मात्र बेघर होताना दिसला. परिणामी ऊच्चभ्रू वस्त्या असो की झोपडपट्या, सर्वच ठिकाणी परप्रातीयांनी राजकीय कब्जा केला आहे.
दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी कट्टरवाद कितीही खरा असला तरी शिवसेनेचा पारंपरिक मतदार म्हणून त्यांच्या बेड्यात अडकलेला मराठी मतदार स्वतःला त्यापासून मुक्त करू इच्छित नाही आणि तेच त्याच्या परिस्थितीत बदल न होण्यास मुख्य कारण आहे. त्यामुळे भविष्यकाळ ओळखून मराठी मतदार आगामी निवडणुकीत एकवटला नाही, तर मात्र मुंबई आणि ठाण्यात मराठी माणसाचा भविष्यकाळ हा यापुढे भीषण असेल हे मात्र खरं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं